‘दो बूंद जिंदगीके ‘असं म्हणत अमिताभ बच्चन च्या माध्यमातून भारत सरकारने ‘पोलिओ मुक्त भारत’ मोहीम चालवली खरी पण अगोदरच पोलिओ बाधित असलेल्या समाजाच्या एका मोठ्या घटकाच्या पुनर्वसनाची समस्या कित्येक वर्षापासून आपल्याकडे होती आणि आजही आहे. या समस्येचे भविष्यातील गंभीर स्वरूप व त्याचे परिणाम लक्षात घेऊन गेली २६ वर्षे अविरतपणे खऱ्या अर्थाने तन, मन, धनझोकून देऊन काम करणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्याच समाजातील काही व्यक्तींचा समुह म्हणजेच ‘अस्मिता’.

१९७६ साली सामाजिक ,सांस्क्रुतिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याच्या उदात्त हेतूने जोगेश्वरी येथील काही दृष्ट्या विचारवंतानी स्थापन केलेल्या अस्मिता संस्थेने १९८९ मध्ये समाज कल्याण खात्याच्या सहाय्याने बोरीवली येथे अशोक वन या ठिकाणी दोन छोट्याशा सदनिकां मध्ये संस्थेचे सर्वेसर्वा दादा पटवर्धन आणि केंद्रप्रमुख सौ सुधा वाघ यांनी ‘अपंग पुनर्विकास केंद्र’सुरु केले. दिवस रात्र झोपडपट्या, सोसायट्या पिंजून काढून अनेक अपंग व्यक्तींना केंद्रा पर्यंत आणण्याचे काम सुरु केले. दुर्दैवाची आणि आश्चर्याची गोष्ट आशी कि ह्या कामात सर्वात मोठा आव्हान होता ते अशा अपंग व्यक्तीचा कुटुंबियांना हे समजावणं कि ही व्यक्ती स्वावलंबी बनू शकते.